महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासन

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासन
उद्देश
आधुनिक भारताच्या सामाजिक पुनर्घेटनेसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे मोठे योगदान लाभले आहे. महर्षी शिंदे यांनी सामाजिक, राजकीय, वैचारिक व संशोधनात्मक क्षेत्रात मौलिक स्वरूपाचे कार्य केले आहे. त्यांच्या सामाजिक कार्याला अनेकविध स्वरूपाचे पैलू होते. एकविसाव्या शतकाच्या वाटचालीत महर्षी शिंदे यांच्या विचारांचे द्रष्टेपण पथदर्शक ठरावे असे आहे. महर्षींच्या विचार कार्याचे द्रष्टेपण ध्यानात घेऊन त्यांच्या सामाजिक, राजकीय, धर्माविषयक व वाङ्मयविषयक कार्याविषयीचे संशोधन व्हावे,विद्यापीठ स्तरावर व संलग्नित महाविद्यालयापर्यंत त्यांच्या विचार कार्याचे पुन:स्मरण व्हावे व प्रसार व्हावा व नव्या पिढीला त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी, महर्षी शिंदे यांच्या आस्थेच्या प्रश्नावर आजच्या काळाच्या संदर्भात चर्चा व्हावी. या उद्देशाने शिवाजी विद्यापीठात महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासनाची स्थापना करण्यात आली आहे. तत्कालीन कुलगुरू प्रा. माणिकराव साळुंखे यांच्या दूरदृष्टीमुळे व मार्गदर्शनाने विद्यापीठात शैक्षणिक वर्ष २००८-०९ या वर्षात या अध्यासनाची स्थापना करण्यात आली. या अध्यासनाच्या प्रमुखपदी मराठी विभागातील प्रा. विश्वनाथ शिंदे यांची नेमणूक करण्यात आली. २००७ पासून २०१६ पर्यंत अध्यासनाचे समन्वयक म्हणून प्रा. डॉ. विश्वनाथ शिंदे यांनी काम पाहिले तर दि. १० सप्टेंबर २०१६ पासून प्रा. डॉ. रणधीर शिंदे हे अध्यासनाचे समन्वयक आहेत.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासन अंतर्गत उपक्रम
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासनाच्या वतीने आजपर्यंत महत्त्वपूर्ण विषयावर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
१) २५ व २६ मार्च २०११ या दोन दिवशी ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे जीवन व कार्य’ या विषयावर चर्चासत्र.
२) २५ व २६ फेब्रुवारी २०१४ साली ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे’ यांचे धर्मचिंतन अस्पृश्यता निवारण’ या विषयावर दोन दिवसीय चर्चासत्राचे आयोजन.
३) २ जानेवारी २०१७ रोजी ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची बहुजन विचाराची संकल्पना आणि सद्यस्थिती’ या विषयावर एकदिवसीय चर्चासत्र आयोजित.
४) २००७ साली प्रा. गो.मा. पवार यांचे ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे जीवन व कार्य’ या विषयावर व्याख्यान.
५) २५ मार्च २०११ रोजीडॉ. एन. डी. पाटील यांचे ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे कार्य व वैचारिकता’ या विषयावर व्याख्यान.
६) २३ एप्रिल २०१४ रोजी भाई वैद्य यांचे ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे सामाजिक व राजकीय योगदान’ या विषयावर व्याख्यान.
७) २ जानेवारी २०१५ रोजी मा. पन्नालाल सुराणा यांचे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे जातीनिर्मुलन विषयक कार्य या विषयावर व्याख्यान.
८) २६ एप्रिल २०१७ रोजी मा. अमर हबीब यांचे म. वि. रा. शिंदे यांचा ‘शेतीविषयक विचार व सद्यस्थिती’ या विषयावर व्याख्यान.
९) २ जानेवारी २०१८ रोजी वि.रा. शिंदे अध्यासन व एन.डी. पाटील प्रतिष्ठान यांच्या वतीने राजर्षी छ. शाहू महाविद्यालय कोल्हापूर येथे एन. डी. पाटील व डॉ. रणधीर शिंदे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.
१०) २ जानेवारी २०१९ रोजी भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न संशोधन आणि कार्य या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन. या चर्चासत्रात डॉ. एन. डी. पाटील, डॉ. गोपाळ गुरु (दिल्ली) डॉ. नागनाथ कोत्तापल्ले (पुणे), डॉ. दिलीप चव्हाण (नांदेड) डॉ. भारत पाटणकर,डॉ. अशोक चौसाळकर सहभागी झाले.
११) २३ एप्रिल २०१९ रोजी महर्षी शिंदे यांच्या जयंतीनिमित्त डॉ. अवनीश पाटील यांचे ‘महर्षी शिंदे यांची विचारदृष्टी’ या विषयावर व्याख्यान.
१२) २ जानेवारी २०२० रोजी पुसेगाव येथे राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन या चर्चासत्रात डॉ.एन.डी.पाटील उपस्थित होते. मा.अशोक चौसाळकर,मा.राजन गवस,डॉ. प्रकाश पवार,श्रीकांत देशमुख, डॉ. नंदकुमार मोरे हे मान्यवर अभ्यासक सहभागी झाले.
१३) २ जानेवारी २०२१ रोजी अध्यासनच्या वतीने ऑनलाईन चर्चासत्र आणि अभिवाचन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासन आणि राज्यशास्त्र विभाग, छ. शिवाजी कॉलेज, सातारा यांनी आयोजित केला. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या समग्र वाङ्मयातील काही निवडक लेख, पत्रे, रोजनिशी यांचे ऑनलाईन अभिवाचन करण्यात आले.
१४) ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : कार्य आणि विचार’ या विषयावर राष्ट्रीय ऑनलाईन चर्चासत्र आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. (डॉ.) डी. टी. शिर्के होते तर डॉ. सदानंद मोरे, डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. प्रकाश पवार, प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर हे वक्ते सहभागी झाले होते. अभिवाचनात सचिन पवार, कोमल कुंदप, ओंकार थोरात, ममता बोल्ली, राजेश पाटील, सुस्मिता खुटाळे हे अभिवाचक सहभागी झाले.
|