लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासन

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासन
उद्देश
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे (१९२०-१९६९) हे मराठी साहित्यातील एक महत्वाचे लेखक, कवी, विचारवंत आणि सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते होते. अण्णा भाऊ साठे यांनी विपुल अशा प्रकारची वाङ्मय निर्मिती केली. कथा, कादंबरी, नाटक, कविता, प्रवास वर्णन आणि वैचारिक वाङ्मय निर्मिती या वाङ्मय प्रकारात त्यांनी मौलिक अशी वाङ्मय निर्मिती केली. दलित, शेतकरी, स्त्रीया, श्रमिक, कामगार, कष्टकरी आणि भटक्यांच्या जीवनाचा आणि महाराष्टातील सामाजिक चळवळीचा एक महत्वाचा लेखाजोखा त्याच्या जीवन कार्य आणि वाङ्मयात आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढयापासून ते विविध सामाजिक चळवळीमध्ये त्यांनी सहभाग घेतला. राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक स्वरूपाचे भान त्यांच्या वाङ्मयीन कामगिरीला आहे. अशा या थोर साहित्यिकाच्या वाङ्मयीन कर्तृत्वाचा अभ्यास व प्रसार करण्यासाठी त्यांच्या वाङ्मयाचे संशोधन व्हावे. विद्यापीठ स्तरावर संलग्नित महाविद्यालयातपर्यत त्यांच्या कार्याचे पुन:स्मरण व्हावे व नव्या पिढीला त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी त्याच्या विविध पैलूंवर चर्चा व्हावी या उद्देशाने शिवाजी विद्यापीठात सन २०१४-१५ या शैक्षणिक वर्षात इंग्रजी अधिविभाग शिवाजी विद्यापीठामध्ये अध्यासनाची स्थापना झाली. सन २०१४ पासून इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ. एम.एल. जाधव हे अध्यासनाचे समन्वयक होते. १ ऑगस्ट २०१७ पासून मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. राजन गवस यांच्याकडे अध्यासनाचे अध्यक्षपद सोपविण्यात आले. तर सध्या प्रा. डॉ. रणधीर शिंदे अध्यासन केंद्राचे समन्वयक आहेत.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासन अंतर्गत उपक्रम
१) दि. १ ऑगस्ट २०१४ रोजी ‘अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य व स्वातंत्र्योत्तर सामाजिक चळवळी’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. डॉ. आ.ह. साळुंखे, अध्यक्ष डॉ. एन. जे. पवार (कुलगुरु, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर), प्रमुख वक्ते मा. डॉ. मिलिंद आव्हाड उपस्थित होते. तर प्रास्ताविक डॉ. एम. एल. जाधव यांनी केले.
२) दि. ८ ऑगस्ट २०१६ रोजी ‘साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ’ या एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन केले. अध्यक्ष प्रा. डॉ. देवानंद शिंदे आणि उद्घाटन उत्तम कांबळे याच्या हस्ते झाले.
३) १ ऑगस्ट २०१७ रोजी अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त भाषा भवन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. आणि अण्णाभाऊ साठे यांच्या वाङ्मयीन कार्यावर डॉ. राजन गवस यांनी व्याख्यान दिले. या कार्यक्रमाला डॉ. रणधीर शिंदे, डॉ. रविंद्र ठाकूर, डॉ. नंदकुमार मोरे उपस्थित होते.
४) २ ऑगस्ट २०१८ रोजी ‘शाहिरी जलसा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या शाहिरी जलश्यामध्ये महाराष्ट्रातील विविध भागातील प्रसिद्ध शाहीर सहभागी झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन मा. कुलगुरु देवानंद शिंदे यांनी केले.
५) १ ऑगस्ट २०१९ रोजी अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त ‘अण्णाभाऊ साठे चित्रपट महोत्सव’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास डॉ. अनमोल कोठाडीया, अभिनेते ज्ञानेश्वर मुळे, मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. रणधीर शिंदे, प्रा. डॉ. नंदकुमार मोरे उपस्थित होते.
६) १ फेब्रुवारी ते २०२० फेब्रुवारी या कालावधीमध्ये अण्णाभाऊ साठे अध्यासन, शिवाजी विद्यापीठ आणि सांस्कृतिक कार्य संचनालय, महाराष्ट्र शासन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शाहिरी प्रशिक्षण शिबीर २०२०’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या समारंभाचे अध्यक्ष मा. प्र. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के तर प्रमुख उपस्थिती कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आणि डॉ. राजन गवस यांची होती.
|