Departmental Chair

संत तुकाराम अध्यासन
उद्देश
वैश्विक साहित्यामध्ये संत तुकाराम हे नाव एक असामान्य कवी म्हणून अजरामर झाले आहेत. संत तुकाराम महाराजांनी आपल्या कवितेतून मानवी जीवनातील उत्कट आणि तळस्पर्शी अनुभवांना शब्दरूप दिले. संत तुकारामांनी केलेल्या वाङ्मयीन रचना या मानवी जीवनाकरिता अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. त्यामुळे त्यांची कविता ही सर्वश्रेष्ठ असे सांस्कृतिक संचित बनली आहे. म्हणून भक्तीमार्ग आणि वारकरी परंपरेत तुकारामांचे कार्य पथदर्शक आहे. त्यांच्या अभंगाचे थोरपण त्यांच्या रचनेतून प्रकटत राहते. तसेच वारकरी परंपरेचे आणि मराठी संस्कृतीचे सार त्यांच्या वाङ्मयीन कर्तृत्वातून प्रकटते. म्हणून तुकोबा हे महाराष्ट्राचे ‘संस्कृती पुरुष’ आहेत. तुकोबांचे जीवनभान, त्यांचे तत्त्वज्ञान त्यांची सुसंवादी भाषा, कवितेतून प्रकट केलेले जीवन दर्शन यातून प्रदेश आणि जाती धर्माच्या सीमा ओलांडून समाजाला आत्मभान देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य तुकाराम महाराजांनी केले आहे.
अशा या थोर संताच्या कार्याचे द्रष्टेपण ध्यानात घेवून त्यांच्या वाङ्मयीन कार्याचे संशोधन व्हावे,विद्यापीठ स्तरावर व संलग्नित महाविद्यालयापर्यंत त्यांच्या कार्याचे पुन:स्मरण व्हावे, त्यांच्या कार्याचा प्रसार व्हावा व नव्या पिढीला त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी, त्यांच्या विविध पैलूंवर चर्चा व्हावी या उद्देशाने मराठी अधिविभाग, शिवाजी विद्यापीठामध्ये संत तुकाराम अध्यासानाची स्थापना १९९३-१९९४ या शैक्षणिक वर्षात झाली. त्यावेळी अध्यासन समन्वयक म्हणून तत्कालीन मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. ल. रा. नसिराबादकर (सर) होते. तर सन २०१७-२०१८ पासून प्रा. डॉ. नंदकुमार मोरे अध्यासन समन्वयक म्हणून अध्यासन केंद्राचे काम पाहत आहेत.
संत तुकाराम अध्यासन अंतर्गत उपक्रम
१) दि. ०८ मार्च,२०१९ रोजी मारुतीराव भाऊसाहेब जाधव (तळाशीकर गुरुजी) यांनी सिद्ध केलेल्या ‘तुकारामबावांच्या गाथेचे निरूपण’ या व्दिखंडात्मक बृहद ग्रंथाच्या मुद्रणाचा प्रारंभ शिवाजी विद्यापीठाचे मा. प्र.-कुलगुरु, प्रा. डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते झाला. यावेळी मा. आमदार प्रकाश आबिटकर, प्राचार्य डी. आर. मोरे, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, सुरेश शिपुरकर आणि मारुतीराव जाधव (गुरुजी) उपस्थित होते.
२) दि. १९ मार्, २०१९ विद्यार्थी वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांसाठी ‘संत तुकाराम : समकालीन प्रस्तुतता’ या विषयावर डॉ. रमेश वरखेडे, (नाशिक) यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी डॉ. नितीन रिंढे (मुंबई), डॉ. शिवराम चव्हाण (पुणे), डॉ. सुनिलकुमार लवटे यांच्यासह वसतिगृहाचे सर्व अधीक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
३) दि. २२ मार्च, २०१९ रोजी संत तुकाराम बीजेनिमित्त मराठी विभागात मारुतीराव जाधव (तळाशीकर गुरुजी) यांचे विद्यार्थ्यांसाठी उद्बोधनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले. अध्यक्षस्थानी विभागप्रमुख प्रा. डॉ. रणधीर शिंदे होते.
४) दि. २७ मार्च ,२०१९ रोजी संत तुकाराम व्याख्यानमालेचे आयोजन शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे करण्यात आले. ‘तुका झालासे कळस’ या विषयावर प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे, सटाणा जि. नाशिक यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे मा. कुलगुरू, प्रा. डॉ. देवानंद शिंदे हे होते. यावेळी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. ए. एम. सरवदे, डॉ. रणधीर शिंदे उपस्थित होते.
५) दि. १९ नोव्हेंबर, २०१९ रोजी ‘ तुकारामबाबांच्या गाथेचे निरुपण’ भाग १ व २ या व्दिखंडात्मक बृहद ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. या ग्रंथाचे प्रकाशन संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि संत तुकारामांचे वंशज डॉ. सदानंद मोरे यांच्या शुभहस्ते झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. डॉ. देवानंद शिंदे होते. यावेळी प्र.कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, ज्येष्ठ लेखक राजन गवस, मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. रणधीर शिंदे, निरुपणकार मारुती भाऊसाहेब जाधव (तळाशीकर गुरुजी) आणि वारकरी संप्रदायातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
६) दि. ११ मार्च,२०२० रोजी शिवाजी विद्यापीठाच्या संत तुकाराम व्याख्यानमालेचे आयोजन राशिवडे बु।।, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर येथे श्री. विठ्ठल मंदिरात करण्यात आले. ‘संत तुकाराम यांच्या गाथेतील भक्तियोग’ या विषयावर प्रा. राजा माळगी यांचे व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी राशिवडे गावातील प्रतिष्ठीत नागरिक दिनकर कृष्णाजी चौगुले (सर) हे होते. यावेळी प्रा. जालिंदर पाटील, मारुतीराव जाधव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
७) दि. ११ मार्च ,२०२० रोजी तुकाराम बीजेनिमित्त राशिवडे बु।।, ता. राधानगरी येथे ‘संत तुकाराम गाथेतील नीतितत्त्वे’ या विषयावर निरुपणकार मारुतीराव भाऊसाहेब जाधव (गुरुजी) यांचे उद्बोधनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले.
|