Department of Marathi
History

 


विभागाचा इतिहास
शिवाजी विद्यापीठ स्थापनेचा एक मुख्य हेतू भाषा, संस्कृती आणि इतिहास यांना चालना देणे असा होता. विद्यापीठ स्थापनेनंतर मराठी भाषा आणि साहित्याचे अध्ययन आणि अध्यापन करणारा विभाग आरंभ काळात नव्हता. या विभागाची उणीव होती. प्रत्यक्षात मराठी विभाग ३ मार्च १९७९ रोजी स्थापन झाला. मराठी विभागाच्या स्थापनेमागे तत्कालीन कुलगुरू भा. शं. भणगे यांचे योगदान आहे. भा. शं. भणगे हे मानव्यविद्या शाखेचा विकास व विस्तार व्हावा, अशी दृष्टी असणारे कुलगुरू होते. समाजदृष्टी आणि समाजशिक्षण विकसित होण्यात भाषाभ्यासाचा सहभाग फार महत्त्वाचा ठरतो, अशी त्यांची भूमिका होती. शिवाजी विद्यापीठामध्ये मराठी भाषा आणि साहित्याचे अध्ययन आणि अध्यापन करणारा विभाग असावा, या धोरणातून भा. शं. भणगे यांनी त्यास चालना दिली.
मराठी विभागाचे स्वरूप कसे असावे, या विभागाचे भाषा, साहित्य, संस्कृतीसंबंधी धोरण काय असावे, यासंबंधी एका समितीची स्थापना करण्यात आली. प्राचार्य म. द. हातकणंगलेकर, डॉ. अशोक केळकर, डॉ. भालचंद्र नेमाडे, म. वा. धोंड आणि डॉ. निर्मलकुमार फडकुले यांच्या समितीने मराठी विभागाची वाटचाल व स्वरूप निश्चितीसंबंधी काही दिशादर्शक सूचना केल्या. त्यानुसार विभागाचे मुख्य अभ्यासक्षेत्र हे साहित्याचा सामाजिक दृष्टीने अभ्यास असे होते. ऐंशीच्या दशकामध्ये या प्रकारच्या अभ्यासशाखेला चालना देणारे अभ्यासक्रम व संशोधन विभागात सुरू झाले. प्रत्यक्षात ३ मार्च १९७९ रोजी विभाग सुरू झाला. विभागाच्या स्थापनेवेळी प्राध्यापक व विभाग प्रमुख म्हणून डॉ. गो. मा. पवार यांची नियुक्ती झाली. तसेच विभाग स्थापनेप्रसंगी डॉ. ल. रा. नसिराबादकर यांची प्रपाठक, तर श्री. रमेश ढावरे व श्री. प्रभाकर पाटील यांची अधिव्याख्याता म्हणून नियुक्ती झाली.
विद्यापीठाच्या स्थापनेपासून वाटचालीत अभ्यासक्रमांचे स्वरूप फार महत्त्वाचे राहिले आहे. साहित्याच्या सामाजिक अभ्यासाबरोबर तौलनिक साहित्याभ्यास, लोकसाहित्य, विशिष्ट कालखंडाचा अभ्यास, वाङ्मय प्रकारांचा अभ्यास या अभ्यासपत्रिकांचा समावेश करण्यात आला. या अभ्यासक्रमांच्या फेररचनेमुळे भाषा-साहित्याच्या विद्यार्थ्यांना अद्ययावत स्वरूपाचे ज्ञान मिळाले. साहित्याच्या आकलन अन्वयार्थाला नव्या दिशा प्राप्त झाल्या. उदाहरणार्थ, हिंदी आणि मराठी, कन्नड आणि मराठी, बंगाली आणि मराठी अशा तौलनिक भाषा साहित्याचा शिस्तशीर अभ्यासाला चालना मिळाली. त्या-त्या भाषिक परंपरेतील नमुनेदार प्राथमिक साहित्यकृतीची निवड करण्यात आली. पदव्युत्तर पातळीवर विद्यार्थ्यांच्या भाषा साहित्याच्या समजुतीत व विकासात अभ्यासक्रमाच्या फेररचनेचा सहभाग महत्त्वाचा आहे. विभा स्थापनेपूर्वी मराठी साहित्याचे पदव्युत्तर अध्यापन होत असे. त्यासाठी आरंभकाळात प्राचार्य भगवंतराव देशमुख, डॉ. भालचंद्र खांडेकर, प्रा. बाळकृष्ण कवठेकर, र. बा. मंचरकर या नामवंत अभ्यासकांनी प्रारंभीच्या काळी विभागासाठी अध्यापनाचे कार्य केले.
विभागात एम. फील  व पीएच. डी पदवीसाठी १९८३ साली अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. आजतागायत विभागातून १८० हून अधिक विद्यार्थ्यानी एम. फील., तर ३७० हून अधिक विद्यार्थ्यानी पीएच. डी. पदवी संपादन केली आहे. मुख्यत्त्वे आधुनिक मराठी साहित्य, लोकसाहित्य,  प्राचीन मराठी साहित्य व तौलनिक साहित्याभ्यास  या अभ्यास क्षेत्रात महत्त्वाची भर टाकणारे संशोधन मराठी विभागात झाले आहे. यातील बरेचसे प्रबंध ग्रंथरूपाने प्रसिद्ध झाले आहेत. संत चोखामेळा, वि. स. खांडेकर, भाऊ पाध्ये, रणजीत देसाई, भालचंद्र नेमाडे, दिलीप चित्रे, महादेव मोरे यांच्या साहित्याचा परामर्श घेणारे प्रबंध प्रकाशित झाले आहेत. तसेच लीळाचरित्रातील समाजदर्शन, मध्ययुगीन समाजदर्शन, शेक्सपिअरच्या नाटकाची मराठी भाषांतरे, ललित साहित्यातील आकृतिबंध या विषयांवरदेखील संशोधन झाले आहेत. महात्मा फुले, विठ्ठल रामजी शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विनोबा भावे, माधवराव बागल, सत्यशोधकांची साहित्यनिर्मिती यांच्या वाङ्मयाचेही पीएच. डी. पदवीसाठी संशोधन झाले. तसेच वाङ्‌मयीन प्रवाहाचे चिकित्सक अभ्यास करणारे प्रबंध लिहिले गेले. 

विभागातील अभ्यासक्रम  
मराठी विभागातील पदव्युत्तर वर्गांचा अभ्यासक्रमही आजपर्यंत अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण राहिला आहे. प्राचीन मराठी वाङमय, महानुभाव संप्रदाय, वारकरी संप्रदायाच्या साहित्याला अभ्यासक्रमातून विशेष स्थान दिले. शिवकालीन पोवाडे, बखरी, मध्ययुगीन पंत वाङमय, लावणी, लोकसाहित्य, समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून साहित्याचा अभ्यास असा विविधांगी अभ्यासक्रम विभागाने दिला आहे. त्याचबरोबर एका लेखकाचा अभ्यास, विशिष्ट साहित्यकृतीचा अभ्यास, एका वाङ्मय प्रकारचा अभ्यास अशा अभ्यासपत्रिकांचाही समावेश केला. भाषाविज्ञान, बोलीअभ्यास, समाजभाषाविज्ञान तसेच उपयोजित मराठी, सृजनात्मक लेखन, आंतरभारतीय साहित्याचा अभ्यास, अनुवाद अशा अनेक नव्या शाखांचा समावेश विभागाने आपल्या अभ्यासक्रमात करून अभ्यासक्रम नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. 

विभागातील उपक्रम
मराठी विभागाच्या स्थापनेपासून भाषा व साहित्यासंबंधी महत्त्वाच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये चर्चासत्रे, कार्यशाळा, उजाळावर्ग, शैक्षणिक सहली, व्याख्याने,अभ्यागत प्राध्यापक अशा योजना राबवण्यात आल्या त्यापैकी मराठी ज्ञानशाखेमध्ये महत्त्वाची भर टाकणाऱ्या व ज्ञानव्यवहाराला दिशादर्शक ठरतील अशा चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले. त्यापैकी १९५०-७५ या पाव शतकातील मराठी साहित्याचा सर्वांगीण आणि चिकित्सक वेध घेणाऱ्या चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रातील नामवंत अशा ४० अभ्यासक्रमांचा यामध्ये समावेश होता. आधुनिक मराठी साहित्य समीक्षा क्षेत्रात या चर्चासत्रांतील विचाराने नवे आयाम प्राप्त करून दिले. वाङमयाच्या पुनर्मूल्यांकनाच्या नव्या दृष्टीमुळे साहित्य आकलनाची व व्यवस्थापनाची दृष्टीच बदलून गेली. स्वातंत्र्योत्तर काळातील कथा, कांदबरी, कविता, नाटक, ललितगद्य, समीक्षा, दलित साहित्य, चरित्र वाङ्मयाकडे पाहण्याची दृष्टी या चर्चासत्राने दिली. या चर्चासत्रात भालचंद्र नेमाडे, रा. भा. पाटणकर, चंद्रकान्त पाटील, विद्याधर पुडंलिक, सुधीर रसाळ, चंद्रशेखर जहागिरदार, सरोजिनी वैद्य, म. द. हातकणंगलेकर, अशोक केळकर, गं. बा, सरदार, गो. मा. पवार या अभ्यासकांचा सहभाग होता. भालचंद्र नेमाडे, विलास सारंग, गो. मा. कुलकर्णी यांनी या चर्चासत्राच्या नेटक्या आणि नेमक्या आयोजनाबद्दल गौरवोद्गार काढले. या चर्चासत्राचे निबंध सायक्लोस्टाईल करून आयोजन एक महिना आधी अभ्यासकांना पाठवण्यात आले होते. जीवनवादी, कलावादी, सैद्धान्तिक आणि उपयोजित साहित्य चर्चा आणि नव्या वाङ्‌मयीन प्रवाहाचे दिशादर्शक प्रारूप या चर्चासत्रातून निष्पण झाले. या चर्चासत्राचे फलस्वरूप म्हणून पॉप्युलर  प्रकाशनाने प्रा. गो. मा. पवार, प्रा. म. द. हातकणंगलेकर संपादित ‘मराठी साहित्य प्रेरणा व स्वरूप’ हा ग्रंथ प्रसिद्ध केला. हा ग्रंथ आधुनिक मराठी समीक्षा परंपरेतला महत्त्वाचा ग्रंथ मनाला जातो.
या चर्चासत्राबरोबर प्रादेशिक साहित्य, लोकप्रिय साहित्य, मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचे स्वरूप, आधुनिक मराठी प्रवाहाचे स्वरूप, वाङ्मयाचे अध्ययन, समीक्षा सिद्धान्त आणि उपयोजन या विषयावर महत्त्वाची चर्चासत्रे झाली. तसेच विभागामध्ये काही उजाळावर्गांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये विशिष्ट विषसुत्रानूसारी सलग २१ दिवस या उजाळावर्गात व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये साहित्याची निर्मिती प्रक्रिया, मराठी रंगभूमी व नाटक, कादंबरीची संकल्पना आणि मराठी कादंबरीची वाटचाल या विषयावरही उजाळावर्गांचे आयोजन करण्यात आले. 
मराठी विभागामध्ये अभ्यागत प्राध्यापक या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील अनेक नामवंत लेखक, कवींना आमंत्रित करण्यात आले. अभ्यासकांसह सृजनशील लेखकही यामध्ये सहभागी झाले. रा. भा. पाटणकर, सुधीर रसाळ, व. दि. कुलकर्णी, सरोजिनी वैद्य, बाबूराव बागूल, भालचंद्र नेमाडे, भाऊ पाध्ये, गंगाधर गाडगीळ, दिगंबर पाध्ये, दत्ता भगत, कमाल देसाई या प्रतिभावंत लेखकांना आमंत्रित करण्यात आले. सृजनशील लेखकांचा विद्यार्थ्यांशी होणाऱ्या मुक्त संवादातून त्यांच्या साहित्य आकलन व निर्मितीसाठी हा उपक्रम अतिशय उपयोगी ठरला. विभागात आमंत्रित करण्यात आलेल्या लेखक कवींच्या विशेष व्याख्यानांचा उपयोग विद्यापीठातील प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्याना व्हावा, यासाठी आयोजन करण्यात येत असे. उदाहरणार्थ, व्यंकटेश माडगूळकर यांचे ‘अरण्यातील अनुभव’ असे व्याख्यान विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. याशिवाय आजही नियमितपणे लेखक, कवी, अभ्यासक यांची व्याख्याने आयोजित करण्यात येतात. 

शिक्षकांचे संशोधन
विभागाच्या स्थापनेपासूनच विभागातील शिक्षकांनी संशोधनाच्या क्षेत्रांत उल्लेखनीय आणि मौलिक असा ठसा उमटविला आहे.  मराठी विचारविश्वात महत्त्वाची भर पडेल असे लेखन केले आहे. डॉ. गो. मा. पवार यांनी वैचारिक आणि समीक्षात्मक स्वरूपाचे लेखन केले. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जीवनकार्यावर त्यांचे नऊ ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य’ या त्यांच्या ग्रंथास साहित्य अकादमीच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांच्या या ग्रंथाची इंग्रजी व भारतीय भाषांत भाषांतरे आलेली आहेत. विनोद विषयक नवे सिद्धान्तन असणारा ‘विनोद तत्त्व आणि स्वरूप’ हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. तसेच त्यांनी आधुनिक साहित्याची केलेली समीक्षा महत्त्वाची आहे. गंगाधर गाडगीळ, व्यंकटेश माडगूळकर, चिं. वि. जोशी, भाऊ पाध्ये, भालचंद्र नेमाडे यांच्या साहित्यसमीक्षा दृष्टीने नवी मर्मदृष्टी लाभली.
डॉ. ल. रा. नसिराबादकर यांनी प्राचीन साहित्याची समीक्षा व व्यवहारोपयोगी मराठी या अभ्यासक्षेत्रात लेखन केले. प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास व व्यवहारोपयोगी मराठी हे विषय महाराष्ट्रातील विद्यापीठ पातळीवर चांगल्या पद्धतीने कार्यन्वित होण्यासाठी त्यांच्या या ग्रंथ लेखनाचा महत्त्वाचा सहभाग होता. याबरोबरच त्यांची काही महत्त्वाची संपादने प्रसिद्ध आहेत. ‘महाद्वाराच्या पायथ्याशी’ व काही महाराष्ट्रीय प्रबोधनपरंपरेची माहिती देणारे ग्रंथ प्रकाशित केले. प्रा. रमेश ढावरे यांनी वैचारिक व दलित साहित्यासंबंधी लेख, पुस्तिका लिहिल्या. प्रा. प्रभाकर पाटील हे व्यासंगी प्राध्यापक व नाटककार म्हणून प्रसिद्ध होते.
डॉ. विश्वनाथ शिंदे यांनी लोकसाहित्याच्या अभ्यासक्षेत्रात मौलिक असे लेखन केले. त्यांचे या विषयावरची सोळाहून अधिक ग्रंथ प्रसिद्ध आहेत. ‘पारंपरिक मराठी तमाशा आणि आधुनिक वर्गनाट्य’, ‘शाहिरी वाङ्मयाच्या धारा’, ‘लोकसाहित्यमीमांसा’ व ‘लोकरंगभूमीच्या शोधात’ हे त्यांचे काही उल्लेखनीय ग्रंथ होय. प्रा. रवींद्र ठाकूर यांनी समीक्षात्मक व ललितस्वरूपाचे लेखन केले. उपयोजित समीक्षाक्षेत्रात त्यांनी केलेले लेखन महत्त्वाचे आहे. ‘मराठी ग्रामीण कादंबरी’, ‘मराठी कादंबरी: समाजशास्त्रीय विवेचन’, ‘कादंबरीकार र. वा. दिघे’, ‘साहित्यिक आनंद यादव’ हे त्यांचे काही ग्रंथ तर काही चरित्रात्मक कादंबऱ्याही त्यांनी लिहिल्या. ‘महात्मा’, ‘धर्मयुद्ध’ या त्यापैकी काही होत. कविता, कथा व कादंबरी लेखन त्यांनी केले. ‘व्हायरस’ ही त्यांची कादंबरी विशेष चर्चेत राहिली. डॉ. कृष्णा किरवले हे २००२ मध्ये प्राध्यापक म्हणून रूजू झाले. त्यांनी दलित साहित्य व आंबेडकरी विचारविश्वावर लेखन केले. आंबेडकरी जलसे या विषयावरील त्यांचा ग्रंथ महत्त्वाचा आहे. बाबूराव बागूल यांच्यावरही त्यांनी लेखन केले. काही सामाजिक प्रश्नांवरही त्यांनी लेखन केले.
डॉ. राजन गवस हे २०१३ मध्ये विभागात प्राध्यापक म्हणून रूज झाले. त्यांनी समीक्षा, संशोधन, ललित वाङ्मयक्षेत्रांत महत्त्वपूर्ण निर्मिती केली. भाऊ पाध्ये यांच्यावरील स्वतंत्र ग्रंथ, भालचंद्र नेमाडे व रंगनाथ पठारे यांच्या साहित्यनिर्मितीचा धांडोळा घेणारी त्यांची संपादने प्रसिद्ध आहेत. तसेच ललित वाङ्मयाच्या त्यांच्या निर्मितीला भारतीय पातळीवर मान्यता मिळाली आहे. कथात्म साहित्यात त्यांच्या लेखनाने वेगळा असा ठसा उमटला आहे. ‘चौंडक’, ‘भंडारभोग’, ‘कळप’, ‘धिंगाणा’, ‘ब-बळीचा’, ‘तणकट’ या कादंबर्या तर ‘रिवणावायली मुंगी’ आणि ‘आपण माणसात जमा नाही’ हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. ‘तणकट’ या त्यांच्या कादंबरीस साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. डॉ. रणधीर शिंदे हे अधिव्याख्याता म्हणून २००५ साली विभागात रूजू झाले. त्यांचे आजवर स्वतंत्र व संपादित असे नऊ ग्रंथ प्रसिद्ध आहेत. दिलीप पुरूषोत्तम चित्रे, शरच्चंद्र मुक्तिबोध व दि. के.  बेडेकर यांच्यावर त्यांचे स्वतंत्र ग्रंथ प्रसिद्ध आहेत. तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, अण्णा भाऊ साठे, राजन गवस, लक्ष्मीकांत देशमुख, इंद्रजीत भालेराव यांच्या लेखनावरची त्यांची संपादने प्रसिद्ध आहेत. डॉ. नंदकुमार मोरे हे २०१३ साली सहाय्यक प्राध्यापक म्हणून विभागात रूजू झाले. त्यांचे भाषाविषयक तीन ग्रंथ प्रसिद्ध आहेत. ‘समाजभाषाविज्ञान आणि मराठी कादंबरी’, ‘भाषासंवाद’, ‘समीक्षापद्धती सिद्धान्त आणि उपयोजन’ हे त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत.
विभागातील प्राध्यापकांनी प्रशासन तसेच राज्य-राष्ट्रीय पातळीवरील शैक्षणिक व सांस्कृतिक समित्यांवर सदस्य, अध्यक्ष व समन्वयक म्हणून काम पाहिले आहे. व्यवस्थापन परिषद, सिनेट सदस्य व अन्य शैक्षणिक समित्यांचे सदस्य म्हणून काम पाहिले. विद्यापीठ अनुदान आयोग, साहित्य अकादमी जनरल कौन्सिल सदस्य, समन्वयक, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, राज्य मराठी विकास संस्था या नामवंत संस्थांवर सदस्य म्हणून कार्य केले आहे. विविध वाङ्‌मयीन व वैचारिक नियतकालिकांचे संपादक म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे. तसेच ‘महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ’ या शासकीय संस्थेच्या विश्वकोश अद्ययावत करण्याच्या योजनेअंतर्गत शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर ‘मराठी साहित्य’ या विषयाची पालकसंस्था म्हणून ज्ञानमंडळाची जबाबदारी पार पाडत आहे. डॉ. राजन गवस यांनी ‘मराठी साहित्य’ विषयाचे समन्वयक म्हणून काम केलेले आहे. तसेच त्यानंतर डॉ. रणधीर शिंदे हे दि. २ जून २०१९ पासून आजपर्यंत ‘मराठी साहित्य’ विषयाचे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. 

विभागातील संशोधन प्रकल्प
विभागातील प्राध्यापकांचे आजवर विविध विषयांवरील लघु व बृहत संशोधन प्रकल्प पूर्ण झाले आहेत. डॉ. ल. रा. नसिराबादकर - १९५० नंतरच्या मराठीतील नियतकालिक सूची, आधुनिक मराठी वाङमयाचा इतिहास, डॉ. विश्वनाथ शिंदे- मराठी तमाशा व वगनाट्य, मराठी दंतकथा, मोनोग्राफ ऑफ मराठी पोवाडा, लोकदेव खंडोबा आणि वाघ्यामुरळी जागरण, डॉ. राजन गवस - अंधश्रद्धेच्या भाषिक व्यवस्थेचा शोध, गुरुवर्य कृष्णराव केळूसकर समग्र वाङमय प्रकल्प, डॉ. रणधीर शिंदे - ग. दि. माडगूळकर गौरवग्रंथ, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय, बौद्ध तत्त्वज्ञानाचा मराठी संत कवितेवरील प्रभाव, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या ललित वाङमयाचा अभ्यास, डॉ. नंदकुमार मोरे - चंदगडी बोली : इतिहास आणि भूगोल, तंजावर मराठी राज्याचे भाषिक आणि वाङ्‌मयीन कार्य, मराठी संस्थानांचा इतिहास इत्यादी विविध संशोधन प्रकल्प विभागातील प्राध्यापकांनी पूर्ण केले आहेत.
विभागात झालेल्या व्याखाने, चर्चासत्रांतील लेखनही ग्रंथरूपाने प्रसिद्ध झाले आहे. ‘मराठी नाटक आणि रंगभूमी’ (संपा. विश्वनाथ शिंदे - हिमांशू स्मार्त) व ‘समीक्षा पद्धती सिद्धान्त आणि उपयोजन’ (संपा. रवींद्र ठाकूर व नंदकुमार मोरे) हे त्यापैकी काही होत. २००७ साली विभागाचे रौप्यमहोत्सवी वर्ष विविध उपक्रमांनी पार पाडले. रौप्यमहोत्सवी चर्चासत्र घेण्यात आले. याप्रसंगी विजय तेंडुलकर उपस्थित होते.
प्रत्यक्ष रीतसर १९७९ मराठी विभाग सुरू होण्यापूर्वी पदव्युत्तर पातळीवरचे अभ्यासकेंद्र विद्यापीठात अस्तित्वात होते. त्यासाठी अभ्यागत प्राध्यापक म्हणून डॉ. ल. रा. नसिराबादकर, पां.ना.कुलकर्णी, भगवंतराव देशमुख, बाळकृष्ण कवठेकर, र. बा. मंचरकर हे नामवंत प्राध्यापक पदव्युत्तर केंद्रास मराठी अध्यापनाचे कार्य करत. आरंभकाळात शाहू संशोधन केंद्रात मराठीचे अध्यापन होत असे. नंतर दीर्घकाळ मानव्यविद्याशाखा इमारतीमध्ये मराठी विभाग होता. २००२  पासून तो वि. स. खांडेकर भाषाभवन इमारतीत स्वतंत्रपणे कार्यरत आहे.

विभागातर्गंत अध्यासने
मराठी विभागात तीन अध्यासने कार्यरत आहेत. ‘संत तुकाराम’, ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे’ आणि ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे’ या अध्यासनांच्या वतीने विविध व्याख्याने व संशोधन ग्रंथ प्रसिद्ध करण्यात येतात. १९९४-९५  साली तनपुरे महाराज, पंढरपूर यांच्या काहीएक देणगीतून ल. रा. नसिराबादकर यांच्या पुढाकाराने संत तुकाराम अध्यासनाची निर्मिती झाली. नोव्हेंबर २०१९ मध्ये संत तुकाराम अध्यासनाच्या वतीने ‘तुकाराम बावांची गाथा भाग १ व २’ या बृहत ग्रंथांचे प्रकाशन केले. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासनाची निर्मिती डॉ. गो. मा. पवार यांच्या पुढाकाराने २००७ साली झाली. या अध्यासनाच्या वतीने महाराष्ट्रातील नामवंत अभ्यासक विचारवंतांची व्याख्याने संपन्न झाली. तसेच महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या विचारकार्याबद्दल संशोधनही प्रसिद्ध करण्यात येत आहे. अण्णा भाऊ साठे अध्यासनाच्या वतीने शाहिरी जलसे, व्याख्याने व प्रबोधन शिबिरांचे तसेच प्रशिक्षण शिबिरांचेही आयोजन करण्यात येते.

इतर उपक्रम
मराठी विभागात दरवर्षी मराठी राजभाषा दिन, मराठी भाषा संवर्धन पंधरवडा विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा होतो. यामध्ये ग्रंथदिंडी, विविध अभ्यासक, तज्ज्ञांची व्याख्याने, लेखकांशी संवाद, मुलाखती, चर्चा, अभिवाचन, काव्यवाचन तसेच ग्रंथ प्रकाशन इत्यादि विविध उपक्रम साजरे केले जातात.   
विभागातील आजी-माजी विद्यार्थ्यांच्या पुस्तकांचे प्रकाशनही विभाग नेहमीच उत्साहाने करीत असतो. विभागाचे  विद्यार्थी नवनाथ गोरे‘फेसाटी’, दत्ता घोलप ‘मराठी कादंबरी आशय आणि आविष्कार’, सयाजी गायकवाड ‘मराठी शाहिरी पोवाडा भाग १, २ व ३’ विष्णू पावले ‘पधारो म्हारो देस’ सुप्रिया आवारे ‘न बांधल्या जाणाऱ्या घरात’  या समीक्षा, ललित, काव्य व कादंबरी ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. विभागातील संशोधक विद्यार्थ्यांना संशोधनासाठी यूजीसी जे.आर.एफ., राजीव गांधी राष्ट्रीय शिष्यवृत्ती ‘सारथी’कडून संशोधन शिष्यवृत्ती प्राप्त झाल्या आहेत. मराठी विभाग हा सातत्याने मराठी साहित्यभ्यास, भाषा व बोली अभ्यास, संशोधन आणि सामाजिक, सांस्कृतिक व वाङ्‌मयीन सहसंबंधासाठी सकारात्मकरित्या प्रयत्नशील आहे.   


Top

Style Options

Icon

Color Scheme

Show Top Bar

Hide Show

Layout

Wide Boxed

Dark & Light

Light Dark

Default Layout

Default